उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील खट्टन मल चौक येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. चहा फुकट न दिल्याने दुकानदाराला आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ३ येथील खट्टन मल चौकात कन्हैया चहा दुकान आहे. याच दुकानाच्या काउंटरवर दुकान मालक कारण सचदेव हे बसले होते. तेव्हा तेथे बिट्टू हा चहा पिण्यास आला. त्याने चहा फुकट पाहिजे असल्याचे सांगितले. तेव्हा दुकान मालकाने बिट्टूला चहा फुकट देण्यास नकारदिला. याचा राग मनात धरून बिट्टू हा तेथून निघून गेला. काही वेळानंतर तो आपल्या २ साथीदारांना घेऊन पुन्हा हॉटेलवर आला.
तेव्हा हॉटेल मालकाचा भाऊ अज्जू सचदेव हा काउंटरवर होता. बिट्टूने परत चहा फुकट मागितला, पण अज्जूने देखील त्याला चहा फुकट देण्यास नकार दिला.. त्यामुळे बिट्टू चांगला तापला आणि त्याच्या २ साथीदारांसह अज्जूला मारहाण केली. सदर मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून बिट्टू आणि त्याच्या २ साथीदारांविरोधात पोलिसांनी भादवी कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.