ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा गट ) उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांनी रेल्वेपुढं उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे. सुधीर मोरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी घाटकोपर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

सुधीर मोरे यांना गुरुवारी रात्री कोणाचा तरी फोन आला होता. त्या फोननंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर जात असल्याचं सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यांनी खासगी सुरक्षा रक्षकाला ही माहिती दिली होती. मात्र बाहेर जाताना ते रिक्षानं गेले होते. त्यानंतर आज पहाटे घाटकोपर आणि विद्याविहार या दोन रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पहाटे दोन वाजता त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुधीर मोरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. विक्रोळी पार्कसाईट परिसरात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिकेत विक्रोळी विभागाचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं. महापालिका प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लोकांमध्ये असलेला त्यांचा दबदबा तसंच शिवसेनेसोबत असलेली निष्ठा या बळावर त्यांना शिवसेनेत अत्यंत प्रतिष्ठेचं स्थान दिलं गेलं होतं. विक्रोळी घाटकोपर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *