ताज्याघडामोडी

राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. काल (शनिवारी) मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता.

दरम्यान शनिवारी राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. आजही राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तर सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडली आहे.

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पवसाचे पाणी शिरले. अनेक भागात पाणी साचून राहिलं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात दमदार हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *