राजस्थानच्या भरतपूरमधून हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीआरपीएफच्या एका महिला कॉस्टेबलनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. या महिलेनं दिल्लीमध्ये आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर तिच्या प्रियकरानं भरतपूर जिल्ह्यातील बानसूर गावात या महिलेच्या पतीच्या मृतदेहाला पुरलं. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी सीआरपीएफमध्ये नोकरीला आहेत. या महिलेच्या पतीची हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकरानं दिल्लीपासून तब्बल 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या बानसूर गावात मृतदेह पुरला. मात्र गुन्हा समोर आलाच. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
प्रियकराच्या मदतीनं या महिलेनं आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी मृतदेह दिल्लीपासून 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या बानसूर गावात आणला. त्यांनी तिथे मृतदेह पूरला. मात्र तरीही प्रकरण समोर आलंच. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच मृतदेह कुठे पुरला त्या स्थळाची देखील पोलिसांना माहिती दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नरेना चौथ पोलीस स्टेशनतंर्गत येणाऱ्या खोह गावचा रहिवासी संजय जाट हा आपली पत्नी पूनमसोबत दिल्लीमध्ये राहत होता. पूनम सीआरपीएफमध्ये कॉस्टेबल आहे. पूनमचे बानसूरचा रहिवासी असलेल्या रामप्रताप गुर्जर नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. रामप्रताप हा देखील सीआरपीएफमध्ये आहे. काही दिवसांसाठी रामप्रताप हा सुट्टीसाठी त्याच्या गावी आला होता. मात्र त्याचवेळी त्याला पूनमचा फोन आला. तिने सांगितलं की आपला पती आपल्याला मारहाण करत आहे. त्यानंतर रामप्रताप हा पुन्हा दिल्लीला आला.
त्यानंतर 31 जुलैरोजी दोघांनी मिळून संजयची हत्या केली. रामप्रताप याने संजयचा मृतदेह आपल्या गावी बानसूरला आणला. त्यानंतर त्याने तिथेच त्याच्या घराशेजारी असलेल्या एका मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह पुरला. इकडे संजयच्या कुटुंबानं तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. याचदरम्यान पोलिसांना संजयची पत्नी पुनमवर संशय आला, तिची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.