ताज्याघडामोडी

शरद पवार धमकी प्रकरणी आठवडभरानंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर

शरद पवार यांचा दाभोलकर करु अशी धमकी सोशल मिडियावर देण्यात आली होती. या प्रकरणी सौरभ पिंपळकर हा संशयित आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रसिद्धी माध्यमांमध्ये हे प्रकरण आल्यानंतर भाजपाने पिंपळकर याची पाठराखण केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांनी पिंपळकर याच्याशी संपर्क साधून आपण तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले होते.

शरद पवार यांचा दाभोलकर करू अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्यानंतर माझ्यासह कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी प्रतिक्रिया पिंपळकर यांनी दिली आहे. या प्रकरणी तथाकथीत पोस्टला मी कुठल्याच प्रकारचे लाईक केलेले नाही, किंवा प्रसिद्धी दिली नाही. माझ्यावरती हेतुपरस्पर असा दावा करण्यात आला आहे. यामुळे मला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे पिपंळकर यांनी माध्यमांना सांगितले. 

सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवून माझ्यावर गंभीर आरोप केले होते. माझ्यावर गंभीर आरोप करणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सौरभ पिंपळकरने यावेळी सांगितले. जे ट्विट केले होते त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याचे तोंड वाकडे होऊन गेले, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, यात शरद पवारांचे कुठेही नाव नव्हते, असा दावा पिंपळकरने पत्रकार परिषदेत केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *