ताज्याघडामोडी

चांदणी मॅडमने १० हजार घेतले न् ACB पथक धडकलं, लाचखोर महिला निरीक्षण अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

रास्त भाव धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्रावर वारस म्हणून नावाची नोंद घेण्यासाठी लवकर अहवाल सादर करण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा विभागाच्या महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई अमरावती एसीबी पथकाने यवतमाळ तहसिल कार्यालयात बुधवार, २४ मे रोजी पार पाडली. चांदणी शेषराव शिवरकर (३२) असे तहसिल कार्यालयातील लाच स्वीकारणाऱ्या निरीक्षण अधिकारी महिलेचे नाव आहे.

तालुक्यातील वाई रुई येथील ४२ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे रास्त भाव धान्य दुकान होते. दुकान प्राधिकार पत्रावर वारस म्हणून तक्रारदाराच्या नावाची नोंद करायची होती. यासाठी तहसील कार्यालय येथे लवकर अहवाल सादर करण्याकरीता पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी शिवरकर यांनी तडजोडी अंती २० हजार रूपयांची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये तक्रारदार यांनी नाईलाजास्तव यापूर्वीच दिले आहे. उर्वरित १० हजार रूपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत सविस्तर तक्रार एसीबी पथकाकडे करण्यात आली होती.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता २४ मे रोजी एसीबी पथकाने तहसिल कार्यालयात सापळा रचला. यावेळी निरीक्षण अधिकारी चांदणी शिवरकर यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या रास्त भाव धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्रावर वारस म्हणून तक्रारदाराच्या नावाची नोंद घेण्याचा अहवाल तहसील कार्यालय येथे पाठविले.

याबाबतचा मोबदला म्हणून १० हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चांदणी शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम त्यांच्या कक्षात स्वीकारल्याने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *