ताज्याघडामोडी

पाच वर्षांच्या चिमुकल्यावरुन बैलगाडा गेला, बैलाने तुडवलं, शर्यतीदरम्यान भीषण घटना

सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने स्पर्धांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच कोकणातील चिपळूण तालुक्यात उत्साहाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. तालुक्यात कळमुंडी येथे आयोजित बैलगाडा स्पर्धेदरम्यान अतिशय गंभीर प्रकार घडला आहे.

पाच वर्षीय मुलाला बैलाने अक्षरशः तुडवले असून चिमुकला गंभीररित्या जखमी झाला आहे. स्पर्धेदरम्यान पाच वर्षाच्या मुलाच्या अंगावरून बैलगाडा गेल्यामुळे हा मोठा अपघात झाला आहे. या चिमुकल्या मुलाला तातडीने कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत.

बैलगाडा स्पर्धेच्या आयोजनादरम्यान होणारी गर्दी व सुरक्षितता हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. कोकणात यापूर्वीही अशा दोन ते तीन अशा घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये दुर्दैवाने जीवही गेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजकांकडून सुरक्षितता व गर्दीचे व्यवस्थापन याची काळजी घेतली जाणे आवश्यक ठरले आहे.

चिपळूण तालुक्यातील कोंढे गावातील अंश सुरेंद्र किलजे असे या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. चिपळूण तालुक्यात कळमुंडीमध्ये रविवारी १४ मे रोजी बैलगाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होत. याच स्पर्धेदरम्यान ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. त्यामुळे या बैलगाडा स्पर्धेला गालबोट लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *