ताज्याघडामोडी

बाल्कनीत उभी असताना स्विमिंग पूलमध्ये लक्ष गेलं आणि अंगाचा थरकाप उडाला, जीव तोडून धावली अन्

१८ वर्षांची तरुणी बाल्कनीमध्ये उभी असताना सोसायटीतील स्विमिंग पूलकडे लक्ष गेले आणि तिला धक्काच बसला. तीन वर्षांची मुलगी स्विमिंग पूलमध्ये बुडत असल्याचे लक्षात येताच ती धावतच खाली आली आणि चिमुरडीचा प्राण वाचवला. १८ वर्षांच्या या तरुणीने दाखवलेले प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला आहे. त्यामुळं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे.

बदलापूर येथील मोहन तुळसी विहार सोसायटीत हा प्रकार घडला आहे. तीन वर्षांची अंशिका स्विमिंग पूलजवळ खेळत होती. खेळत असताना अचानक तिचा पाय घसरला व ती स्विमिंग पुलमध्ये कोसळली. त्याचवेळी घराच्या बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या निधी उमरानिया या तरुणीने अंशिकाला स्विमिंग पुलमध्ये पडलेले पाहिले. तेव्हा ती तातडीने सोसायटीच्या कंपाउंडमध्ये आली. तिने पूलमध्ये उडी मारुन अंशिकाला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तेव्हा निधीने तिला सीपीआर देत शुद्धीवर आणले.

अंशिकाचा जीव वाचवल्यानंतर निधी म्हणते की, मी माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये उभी होते. त्याचवेळी आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या मुलीला मी पूलमध्ये पाहिले. पण तेव्हा ११ वाजले होते. इतक्या रात्री तिला पूलमध्ये पाहून मला आश्चर्य वाटले. म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितले. पण थोड्याचवेळात मला पूलमध्ये कोणतीच हालचाल जाणवली नाही. तेव्हाच मला थोडी शंका आली की ती बुडतेय. म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता धावतच खाली उतरले व स्विमिंग पूलमध्ये उडी घेत तिला बाहेर काढले.

आंशिकाला बाहेर काढल्यानंतरही ति कोणतीच हालचाल करत नव्हती. म्हणून मी ओटीपोटावर दाब देत पोटातून पाणी बाहेर काढायला सुरुवात केली. मात्र, तरीही आंशिका काहीच हालचाल करत नव्हती. शेवटी मी तिचं नाक दाबून तोंड उघडलं आणि तोंडाने श्वास दिला. त्यानंतर तिने डोळे उघडले. त्यानंतर माझ्या वडिलांच्या आणि आमच्या एका शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. ती दोन दिवस रुग्णालयात होती. तिला शनिवारी डिस्चार्ज जेण्यात आला, असंही निधीने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *