ताज्याघडामोडी

रात्री ओयो हॉटेलात कामगार एकटाच; सकाळी फोन घेईना, हाकेला प्रतिसाद देईना; पोलीस आले तेव्हा..

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मोदीनगरातील एमआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या क्राऊन ओयो हॉटेलात मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. दक्ष असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो १९ वर्षांचा होता. दक्षच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय, नातेवाईक हॉटेलबाहेर जमले. त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. पोलिसांनी हॉटेलच्या बाहेर पोहोचून दक्षच्या कुटुंबीयांना शांत केलं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

क्राऊन ओयो हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दक्षचा मृतदेह एका खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. मोदीनगरात राहणारे प्रियांशु सिंघल निवाडी मार्गावर असलेल्या एमआयटी महाविद्यालयाजवळ असलेलं क्राऊन ओयो हॉटेल चालवतात. मेरठच्या परतापूरमधील अधेडा गावात राहणारा १९ वर्षांचा दक्ष गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलमध्ये काम करत होता. दक्षची ड्युटी रात्रीची होती.

मंगळवारी सकाळी मॅनेजर प्रियांशु सिंघल हॉटेलवर पोहोचले. त्यावेळी त्यांना हॉटेल बंद आढळून आलं. प्रियांशु यांनी दक्षला आवाज दिला. मात्र त्यांनी मारलेल्या हाकांना कोणताच प्रतिसाद आला नाही. प्रियांशु यांनी दक्षच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र त्यानं फोन घेतला नाही. यानंतर प्रियांशु यांनी पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी हॉटेल गाठून छतावरून आत प्रवेश केला. तेव्हा एका खोलीत दक्षचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी खोलीची झडती घेऊन मृतदेह खाली उतरवला. काही वेळातच दक्षचे कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हॉटेलबाहेर जमले. दक्षची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *