नागपुरात गुन्हेगारीच्या घटना घडत असताना महिलांवरील अत्याचाराची प्रकरणंही समोर येत आहेत. नागपुरात एकाच दिवशी तीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना सोमवारी समोर आल्या. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक अद्याप फरार आहे.
पहिल्या घटनेत ११ आणि १० वर्षांच्या दोन मुली त्यांच्या घराच्या गच्चीवर खेळत होत्या. त्यानंतर वस्तीत राहणारा आरोपी महेंद्र गजभिये (वय ५०) तेथे पोहोचला आणि मुलींसोबत अश्लील कृत्य करू लागला. आरोपी हा कलाकार असून तो कार्यक्रमात गाण्याचे काम करतो. यावेळी आरोपीने दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला.
आरोपीचे हे कृत्य तिसऱ्या मुलीने पाहिले. यानंतर आरोपी तिच्याकडे पोहोचला आणि कोणालाही काही सांगू नकोस असे सांगितले. सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे तिन्ही मुलींच्या रडण्याने आरोपी तिथून पळून गेला. यानंतर तिन्ही मुली रडत रडत नातेवाईकांकडे गेल्या आणि सर्व प्रकार सांगितला. मुलींचे म्हणणे ऐकून जमलेल्यांनी जरीपटका पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दुसरे प्रकरण जरीपटका पोलीस ठाण्यातूनच समोर आले आहे. जिथे घराबाहेर खेळत असलेल्या एका सात वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणारा आरोपी संघपाल पांडुरंग साखरे (वय ३०) याने बलात्कार केला. मुलगी खेळत असताना तिला बोलावून जवळ असलेल्या ई- रिक्षामध्ये नेले आणि हे कृत्य केले. मुलगी रडत रडत घरी गेली आणि तिने आईला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.