ताज्याघडामोडी

लेक गोबरगॅसच्या टाकीत पडला; शेणातून बाहेर काढण्यासाठी बाबा-काका धावले; चौघांचा करुण अंत

बारामती तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या निचरा चारीत पडून चौघांचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील खांडज गावात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत पिता-पुत्रासह चुलत्याचा व अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. घरातले कर्ते पुरुष गेल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे. तिघांच्या अचानक जाण्यानं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापूराव लहूजी गव्हाणे अशी मृतांची नावं आहेत. प्रविण आटोळे तोल जाऊन गोबर गॅसच्या टाकीमध्ये पडला. टाकीतील कालवलेल्या शेणात तो अडकला. त्याला वाचवण्यासाठी वडील भानुदास आटोळे आणि चुलते प्रकाश आटोळे टाकीत उतरले.

पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ टाकीतून कोणीही बाहेर येत नसल्याचं पाहून तिघांना वाचवण्यासाठी शेजारी राहत असलेले बापुराव गव्हाणे टाकीत उतरले. मात्र दुर्दैवानं टाकीत उतरलेल्या चौघांचाही गुदमरून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावच्या हद्दीत २२ फाट्याजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना घडली.

एकाच घरातील तीन जण गेल्यानं आटोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण हा घर चालवायचा. घराची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. वडील प्रकाश आटोळे वृद्ध होते. मात्र तरीही ते घरात थोडाफार हातभार लावायचे. प्रवीण हा घरातला कर्ता होता. त्याच्या अकाली निधनानं कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आटोळे कुटुंब शेती आणि गुरांचा व्यवसाय करतं. प्रवीणला आणखी एक भाऊ असून तोही त्यांना शेतीच्या कामात मदत करायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *