कर्नाटकची राजधानी बंगळुरूत संपत्तीसाठी मुलानं वडिलांची हत्या केली. वडिलांच्या खुनासाठी मुलानं १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती. वडिलांची हत्या करणारा ३२ वर्षीय मुलगा बेरोजगार असून काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला होता. तुरुंगात असतानाच त्याचा काही गुन्हेगारांशी संपर्क साधला. त्याच गुन्हेगारांना आरोपीनं वडिलांच्या हत्येची सुपारी दिली.
आरोपी मुलाचे वडील त्यांच्या पत्नी आणि सुनेसह एका फ्लॅटमध्ये राहतात. १३ फेब्रुवारीला त्यांची इमारतीबाहेर हत्या झाली. हल्लेखोरांनी चाकू भोसकून त्यांना संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी दोन मारेकऱ्यांसह आरोपी मुलाला अटक केली आहे. वडिलांच्या हत्या प्रकरणात अटक झालेला मुलगा याआधी पहिल्या पत्नीच्या खुनाच्या आरोपात तुरुंगवास भोगून आला आहे.
मराठाहल्लीच्या कावेरप्पा ब्लॉकमध्ये वास्तव्यास असलेल्या नारायण स्वामी यांची त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर हत्या झाली. दोन बाईकस्वारांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. नारायण स्वामी यांचा मुलगा एन मणिकांत हत्येचा साक्षीदार होता. मणिकांतनं हत्येच्या नंतर लगेचच मराठाहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी मणिकांतसोबत आदर्श टी आणि शिवकुमार एनएमला अटक केली.
वडील नारायण स्वामी मणिकांतची दुसरी पत्नी अर्चनाला फ्लॅट गिफ्ट देण्याच्या विचारात होते. तसा विचार त्यांनी बोलूनही दाखवला होता. मणिकांतच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची वडिलांना संपूर्ण कल्पना होती. त्यामुळेच आपल्यानंतर सुनेचे हाल होऊ नयेत, या विचारानं ते फ्लॅट तिच्या नावावर करणार होते. पहिल्या पत्नीच्या हत्या प्रकरणात मणिकांत तुरुंगात गेला. २०२० मध्ये त्याची सुटका झाली. यानंतर मणिकांत आणि अर्चनाचा विवाह झाला. मात्र दोघांचे संबंध बिघडले होते. ऑगस्टमध्ये मणिकांतनं अर्चनावर चाकू हल्ला केला. त्या प्रकरणात त्याला अटक झाली. मणिकांत काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. तो अर्चनापासून वेगळा राहत होता.
वडिलांवर हल्ला झाल्यानंतर मणिकांत लगेचच पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. मणिकांतची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं संशय आणखी वाढला. वडिलांवर चाकूहल्ला होत असताना मणिकांतला साधं खरचटलंही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी मणिकांतचे कॉल डिटेल्स काढले. तेव्हा तो दोन व्यक्तींच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं समोर आलं.