ताज्याघडामोडी

पोलिसच असुरक्षित… दोन गुंडांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

गुंडांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घटना घडली आहे.

मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी गुंडाची नावे आहेत. खळबळजनक बाब म्हणजे ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयात अंतर्गत ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात १४८ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहे. यामुळे पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरात शासकीय मध्यवर्ती रुग्णालय आहे. या रुग्णालयात मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर हे सुरक्षेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ड्युटीवर होते. काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांच्यामध्ये मध्यवर्ती रुग्णालयात वाद सुरू होता. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांनी या वादात हस्तक्षेप केला असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्या अंगावर अचानक धाव घेत शर्ट पकडत त्यांना मारहाण केली. मारहाण करत असतानाच कोणी तरी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *