ताज्याघडामोडी

शिंदे-फडणवीसांनी गौतम अदानींच्या मुलावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानं अदानी समूहाला हादरा दिला आहे. हिंडेनबर्गच्या १०६ पानी अहवालानं अदानी समूहाच्या व्यवहारांवर, कारभारांवर बोट ठेवलं. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स तब्बल ६० टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी समूहाचं भागभांडवल निम्म्यानं घटलं आहे. अदानी समूहासाठी सध्याचा काळ कसोटीचा आहे. एकापाठोपाठ एक संकटं येत असताना महाराष्ट्रातून अदानींसाठी महत्त्वाची बातमी आहे.

राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीत गौतम अदानी यांचे सुपुत्र करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचादेखील समावेश आहे. या समितीचं नेतृत्त्व टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन करतील. अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडचे सीईओ म्हणून करण अदानी कार्यरत आहेत.

राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीत करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत २१ जणांचा सहभाग आहे. त्यात करण अदानी बंदरं आणि एसईझेड क्षेत्राचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत राहतील. ‘आर्थिक आणि अन्य संबंधित मुद्द्यांवर राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी एक स्वतंत्र समिती म्हणून आर्थिक सल्लागार समिती काम करेल. या समितीत कापड, फार्मा, बंदरं, विशेष आर्थिक क्षेत्र, बँकिंग, कृषी, इंजिनीयरिंग आणि उत्पादन यांच्यासह अन्य अनेक क्षेत्रांमधील जाणकारांचा समावेश करण्यात आला आहे,’ असं सरकारनं प्रस्तावात म्हटलं आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत यांच्याकडे सध्या ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी आहे. तर ३५ वर्षांच्या करण अदानी यांच्याकडे अदानी समूहातील अदानी पोर्ट्स आणि सेझ लिमिटेडची जबाबदारी आहे. याशिवाय अदानी होल्डिंग्ज लिमिटेडमध्ये ते संचालक पदावर कार्यरत आहे. २०१९ पासून त्यांच्याकडे अदानी समूहाकडे असलेल्या विमानतळांची जबाबदारी देण्यात आली. देशातील सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचं कंत्राट अदानींना मिळालं आहे. त्या व्यवसायात करण लक्ष घालतात. सप्टेंबर २०२२ मध्ये अदानी समूहानं सिमेंट निर्मिती क्षेत्रातील एसीसी ही बलाढ्य कंपनी ताब्यात घेतली. एसीसीचे संचालक म्हणूनही करण अदानी काम पाहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *