ताज्याघडामोडी

सात महिन्यांच्या गरोदर प्राध्यापिकेने मृत्यूला कवटाळलं, कॉलेजहून आल्यावर बेडरुममध्ये अंत

३० वर्षीष उच्चशिक्षित गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात गारखेडा परिसरात घडली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी करणाऱ्या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं ७८-७८, गजानन कॉलनी, कन्या शाळेच्या बाजूला, गारखेडा परीसर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असताना २०१२ मध्ये वर्षा यांची नातेवाईक असलेल्या दीपक नागलोत यांच्याशी ओळख झाली. त्यातून प्रेम जुळल्यावर त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार आहेत. या दाम्पत्याला ८ वर्षांचा मुलगा दुसरीत शिकत आहे. तर वर्षा सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा शुक्रवारी एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून परतल्या. त्यानंतर बेडरूमध्ये पंख्याला ओढणीच्या सह्याने गळफास घेतल्याचे सायंकाळी ६.२० वाजता समोर आले.

पती दीपकसह सासरकडील मंडळींनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यावेळी आणलेली दीपक यांची कार अपघात विभागासमोर सोडून ते निघून गेले. ही कार शनिवारी सकाळपर्यंत घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर उभी होती, असे नातेवाईकांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या वर्षा यांना गेल्या वर्षांपासून सासरचा जाच होता. मात्र, प्रेमविवाह असल्याने त्या माहेरी काही सांगत नव्हत्या. गुरूवारी घरात काहीतरी वाद झाला होता. त्यावेळी वर्षा यांच्या सासूने वर्षा यांचे वडील शांतिलाल जारवाल (रा. सजरपुरवाडी, ता. वैजापुर) यांना फोन करून वर्षाने काही सांगितले का अशी विचारणा केली होती.

सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत वर्षा यांच्या वडिलांनी शनिवारी केला आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *