धरणगाव तालुक्यातील रेल येथे एका घरावर दरोडा पडला. यावेळी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. तिच्या कानातील सोन्याचे किल्लू निघत नसल्याने दरोडेखोरांनी अखेर महिलेचा कान कापून नेला. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरुन नेले. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील रेल येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील रेल गावातील रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय ७० वर्ष) या गावातील मंगल नथ्थू पाटील याच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहेत. २९ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोर त्यांच्या घरात घुसला. यावेळी विमलबाई पाटील या खाटीवर झोपलेल्या होत्या.
यावेळी दरोडेखोराने विमलबाई यांना डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी दरोडेखोराने विमलबाई यांच्या कानातले सोन्याचे दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निघत नसल्याने दरोडेखोराने थेट वृद्ध महिलेचा कानच कापला.
विमलबाई यांच्या कानातले २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. या घटनेत विमलबाई यांना मोठी दुखापत झाली असून त्यांच्या कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्या जखमी झाल्या. दरम्यान, सकाळी ९ वाजले तरी आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला.