ताज्याघडामोडी

मोबाईलचा हप्ता चुकल्याने वसुली एजंटकडून तरुणास मारहाण

बँकेचे हप्ते थकल्यावर वसुलीसाठी गुंड येतात हे अनेक वेळा काही जणांनी अनुभवले. मात्र हा हप्ता मोबाईलचा असेल तर,पण हे खरे आहे. मोबाईलचा हफ्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीचा गुंड आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी दोन भावंडांना भरबाजारात दांडे आणि कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यातील एक जण या मारहाणीत बेशुद्ध पडला तर दुसरा दयेची भीक मागत असूनही टोळक्याने मारहाण थांबवली नव्हती, तर बघ्यांची गर्दी वाढत होती. बुधवारी दुपारी औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या कॅनॉट गार्डन भागात ही घटना घडली.

अनिकेत शहाणे व अभिषेक शहाणे या दोन सख्ख्या भावांपैकी अनिकेतने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन मोबाईल खरेदी केला होता. या कर्जाचा चालू महिन्याचा साडेतीन हजार रुपयांचा हफ्ता अनिकेतकडून भरला गेला नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने त्याला कॉल केला. यावेळी झालेल्या चर्चेअंती दोघांची कॅनॉट परिसरात भेट झाली. अभिषेक पण अनिकेतसोबत होता. सध्या पैसे नाहीत, काही दिवसांनी पैसे भरतो, असे यावेळी अनिकेतने संबंधित वसुली करणाऱ्याला सांगितले. मात्र वसुली कर्मचारी ऐकून घेण्यास तयार नव्हता. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद वाढत गेल्यावर फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या तरुणाने आठ ते दहा जणांना तेथे बोलावून घेतले. 

अनिकेत व अभिषेक हे दोघेही कॅनॉट परिसरातच उभे होते. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तेथे येताच दोन्ही भावांवर हल्ला चढवला. कंबरेचे बेल्ट, दांडे हातात असलेल्या या टोळक्याने दोन्ही भावांना रस्त्यावर पाडून निर्दयीपणे मारहाण केली. या टोळक्याने दोघांना इतकी मारहाण केली की त्यात अनिकेत बेशुद्ध पडला. तरीही त्याला मारहाण करणे थांबलेले नव्हते. तर अभिषेक हात जोडून दयेची भीक मागत होता. एवढे होऊनही कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी मध्ये पडून दोघांना वाचवले. काही जणांनी सिडको पोलिसांना घटनेची माहिती कळवली. काही क्षणातच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी दोन्ही जखमी भावांना रुग्णालयात हलवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *