ताज्याघडामोडी

लेकीचं लग्न पाहायचंय, आयसीयूत झालं शुभमंगल सावधान, अन् काहीच तासात…

बिहारच्या गयामध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेने आयसीयुतच आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. दुर्दैव म्हणजे या लग्नाच्या काही तासांनंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.

नेमकं प्रकरण काय?

गया जिल्ह्यातील गुरुरु ब्लॉकमधील बाली गावातील रहिवासी लालन कुमार यांची पत्नी पूनम कुमारी वर्मा यांना हृदयविकाराचा त्रास होता. आशा सिंह मोड मॅजिस्ट्रेट कॉलनीजवळील अर्श हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच, कधीही त्यांचा मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टारांनी नातेवाईकांना सांगितलं.

डॉक्टारांनी असं सांगितल्यानंतर पूनमने मुलगी चांदनी कुमारीचा विवाह मी जिवंत असतानाच करावा अशी इच्छा व्यक्त केली. २६ डिसेंबर रोजी गुरुवा ब्लॉकच्या सलेमपूर गावात राहणाऱ्या सुमित गौरवसोबत त्यांच्या मुलीचा साखरपुडा होणार होता. मात्र, मुलीच्या आईच्या आग्रहास्तव दोघांचे लग्न साखरपुड्याच्या तारखेच्या एक दिवस आधीच लावण्याचं ठरलं.

यानंतर दोघांनीही हॉस्पिटलमधील आयसीयू रूमच्या दाराबाहेर लग्न केले आणि पूनम त्याची साक्षीदार बनली. महिलेच्या आजारपणाच्या दु:खातच मुलीच्या लग्नाचा आनंदही लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण, यादरम्यान असे काही घडले ज्याची पूनम आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटत होती. लग्नानंतर काहीच तासात पूनमचा मृत्यू झाला.

लग्नानंतर अवघ्या दोन तासांनी आई गमावलेल्या चांदनीने सांगितले की तिची आई पूनम वर्मा मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एएनएम म्हणून काम करत होती. कोरोनाच्या काळापासून त्या सतत आजारी होत्या. त्यांनी हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *