कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. स्वरा संतोष घाडीगावकर(रा.वागदे, सावरवाडी) असे तिचे नाव आहे.
ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्या विद्यार्थिनीला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे ,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शाळेच्या आवारात हा प्रकार घडला असल्याने त्या विद्यार्थिनीवर योग्य उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयात तत्काळ उपचारा करता दाखल करा अशी मागणी त्यांनी तसेच ग्रामस्थानी केली. त्यानंतर कणकवली येथील खासगी रुग्णालयात त्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वरा घाडीगावकर ही मुलगी शाळेतील वर्गात खिडकीजवळील बेंचवर बसून आपल्या वहीमध्ये काही तरी लिहीत होती. त्यामुळे तिच्या हातातील पेनाची हालचाल सुरू होती. त्याचवेळी खिडकीच्या झडपावर एक मण्यार जातीचा साप होता. त्याने हालचाल होत असलेल्या पेनवर अचानक उडी मारली. तसेच स्वरा हिच्या हाताला दंश केला. अचानक हा प्रकार घडल्याने शाळेच्या वर्गात एकच गोंधळ उडाला. इतर मुलेही घाबरली. शिक्षकांनी स्वरा हिच्या कुटुंबियांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच तत्काळ कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. सोबत त्या मण्यार जातीच्या सापालाही एका बरणीत भरून आणण्यात आले होते. त्यामुळे सापाची ओळख पटण्यास मदत झाली.
तिच्यावर तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संतोष चौगुले व अन्य डॉक्टरानी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर आहे,असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.