लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
महेश राजाराम तवंडे (वय ३२, ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नैराश्यातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मूळचा कोल्हापूर येथील असणारा महेश हा पुण्यामध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करत होता. तो गेल्या वर्षभरापासून त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. गणपती उत्सवापासून मैत्रीण बाहेरगावी गेली होती. दरम्यान त्याने शुक्रवारी फ्लॅट आतून बंद करुन स्वतःच्याच हाताने शरीरावर व गळ्यावर वार केले. दुपारी घरमालकाला ओरडण्याचा आवाज आला होता परंतु नेहमीच या तरुणाच्या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली.
याबाबत माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेला फ्लॅटचा दरवाजा तोडला असता महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून सिंहगड रस्ता पोलीस पुढील तपास करीत आहेत.