स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण – कसारा रेल्वे मार्गावरील शहाड रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. सनी बैसाने असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सनीच्या आत्महत्येचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सनी बैसाने याने 17 ऑगस्टला रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती नसल्याने त्यांनी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र रेल्वे ट्रॅकच्या बाजुला अनोळखी मृतदेह पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर ही आत्महत्येची घटना उघड झाली आहे.
सनी हा अभ्यासात अतिशय हुशार असल्याचे त्याच्या नातेवाईकाने सांगितले. सनीने पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. तसेच एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ही तरुणी त्याच्याकडे पैसे, दागिने आणि लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. त्यामुळे सनी हा मानसिक तणावाखाली असल्याने त्याने शहाड रेल्वे स्थानकाजवळ १७ ऑगस्टला वेगाने धावणाऱ्या मालगाडी समोर धावत जाऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे.
याप्रकरणी तरुणीवर कारवाई करण्याची मागणी सनीच्या कुटुंबीयांनी केली आहे. विशेष म्हणजे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनीच्या आत्महत्येची घटना समोर आली. तर दुसरीकडे घटनेची नोंद करून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.










