तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन विवाह संपन्न झाला… त्यानंतर दहा दिवस संसारही केला. या दोन लेकरांच्या विवाहितेला परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याच्या बेतात असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तसेच या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच फसवेगिरी करणारी नवरी दोन मुलांची आई असल्याचे निष्पन्न झाले..
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील रावसाहेब भाऊसाहेब सहाणे (25) हा तरुण नेवासा येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. या तरुणाच्या विवाहासाठी नातेवाईकाने रमेश शेळके याच्या मध्यस्थीने एक मुलगी पहिली. रमेशने सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते. तसेच लग्न करायचे असल्यास तिला 2 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
मुलगी मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक लग्नास तयार झाले. त्यानंतर, 24 जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्यासोबत लावून देण्यात आला. यावेळी लग्नाला मुलीच्या आईसह आदी नातेवाईकांची उपस्थिती होती.
लग्न लावल्यानंतर वरपक्षातर्फे त्यांना 2 लाख रुपये देण्यात आले. दरम्यान नवरदेव रावसाहेब नववधू हे दांपत्य सोयगाव देवी येथे आले. दरम्यान गावातील भावबंधाच्या उपस्थितीत पुन्हा 25 जून रोजी देविदास बाबा यांच्य मठावर नवदांपत्याचा दुसऱ्यांदा विवाह लावण्यात आला. दरम्यान, लग्नानंतर सोनी एकदा माहेरी जाऊन आली. परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जात आहे असे सांगितले. 6 जुलै रोजी भोकरदन बसस्टँडवर रावसाहेब सोनीला सोडण्यास घेऊन आला.
तेव्हा तिथे तिचा प्रियकर उपस्थित होता. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रावसाहेबने पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत झालेल्या फसवणूकीची माहिती दिली. यावरुन भोकरदन पोलिसांनी नववधूला ताब्यात घेत विचारपूस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक राजाराम तडवी यांनी पोलिसी खाक्या दाखवताच सोनी पोपटासारखी सत्य बोलू लागली. आपण पैसे घेऊन लग्न करत फसवणूक केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.
प्रकरणी रावसाहेब सहाणे यांच्या तक्रारीवरून नववधू सोनी वानखेडेसह इतर नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नववधू सोनी वानखेडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोनीचे लग्नातील पाहुणे मंडळी बनावट असल्याचे समोर आले आहे. तसेच सोनी वानखेडे ही विवाहित असून तिला दोन मुली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत आहे.