ताज्याघडामोडी

अखेर राज्याची कोरोना निर्बंधातून सुटका; आता मास्क देखील ऐच्छिक!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध काढले जाणार की नाही? यावरून चर्चा सुरू होती. पण, आता राज्य सरकारने त्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणे हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना दिली आहे.

गुढी पाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रीमंडळाने घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतेही बंधन राज्यात राहिलेले नसल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी, आंबेडकर जयंती असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारने येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. यासंदर्भात राज्य सरकारवर विरोधकांनी सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ एप्रिल अर्थात गुढीपाडव्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. काही ठिकाणी शोभायात्रांना परवानगी मिळाली असून मुंबईसह अन्य भागातील पोलीस राज्य सरकारच्या कोरोना निर्बंध शिथिलीकरणाच्या सूचनांची वाट पाहात आहेत.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल केले जातील, असे नमूद करून टोपे म्हणाले, कोरोनाबाधितां संख्या घटल्याने मास्कसक्ती रद्द करण्याची मागणी अनेक संस्था, संघटना व नागरिकांनी केली आहे.

मात्र त्याबाबत वैद्यकीय कृतीगटाची चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रा व मिरवणुकांच्या परवानगीबाबत आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे राजेश टोपे म्हणाले होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *