तामिळनाडूच्या सेलममध्ये एक विचीत्र घटना समोर आली आहे. एका दारूड्या ट्रक चालकाकडून पोलिसांनी गाडी जप्त केल्याने त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याची हालत गंभीर आहे.
संतोष कुमार असे त्या ट्रक चालकाचे नाव असून तो अरसमराथु करत्तूर येथील रहिवासी आहे. तो ट्रक चालक म्हणून काम करतो. तामिळनाडू येथील कोंडापट्टी येथे पोलीस वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान पोलिसांनी तपासणीसाठी संतोषलाही थांबवले. त्याची तपासणी केली असता तो नशेत ट्रक चालवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्याचे 10 हजार रुपये चलान कापून त्याचे वाहन जप्त केले.
ट्रक जप्त केल्याने संतोष निराश झाला. त्यानंतर तो जवळच्या पेट्रोलपंपावर गेला आणि तिथून पेट्रोल घेऊन चेकपोस्टाजवळ आला. त्यानंतर संतोषने पोलिसांच्या समोर पेट्रोल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतसे. आग लागल्यावर संतोष किंचाळायला लागला आणि इथे-तिथे धावायला लागला. पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून संतोष कुमारला सरकारी रुग्णालयात भरती केले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष जास्त भाजला असून त्याची हालत गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. सध्या संतोषने स्वत:ला पेटवून घेतल्याचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.