गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नक्कल करण्यासाठी विद्यार्थ्याने लढवली हायटेक शक्कल! शिक्षकही झाले थक्क

परीक्षेत नक्कल अर्थात कॉपी करणं हा काही नवीन प्रकार नाही. पण, काळाच्या ओघात कॉपी करण्याच्या पद्धती मात्र आधुनिक होत चालल्या आहेत. मध्य प्रदेशात अशाच एका शक्कलेमुळे शिक्षकही थक्क झाले आहेत.

मध्य प्रदेशच्या इंदूर येथे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षेवेळी हा प्रकार घडला आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा भलताच वापर करून या विद्यार्थ्याने अशी काही युक्ती लढवली की काही क्षण शिक्षकांचीही मती गुंग झाली.

या महाविद्यालयात सध्या परीक्षा सुरू आहेत. घटनेच्या दिवशी परीक्षा सुरू असताना अचानक एक भरारी पथक महाविद्यालयात दाखल झालं. तिथे तपासणी करताना एका विद्यार्थ्याकडे मोबाईल सापडला. त्याला ब्ल्यूटुथ होतं आणि ते कुठल्यातरी यंत्राला जोडल्याचं दिसत होतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली. संपूर्ण तपासणी करूनही जेव्हा कुठेही ते यंत्र आढळलं नाही, तेव्हा विद्यार्थ्याची कसून चौकशी केली गेली.

या चौकशीत त्याने एक धक्कादायक खुलासा केला. त्याच्या कानात शस्त्रक्रियेच्या साहाय्याने त्याने मायक्रो ब्ल्यूटुथ यंत्र बसवून घेतलं होतं. जेणेकरून तो कुणालाही न कळता कॉपी करू शकेल. तसंच त्याने ही युक्ती आपल्याच एका विद्यार्थी सहकाऱ्याला सांगितल्याचंही कबूल केलं.

त्या विद्यार्थ्यालाही ताब्यात घेण्यात आलं. त्याने कपड्याच्या आत ते यंत्र लपवून ठेवलं होतं. हा विद्यार्थी गेली अकरा वर्षं परीक्षेत उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न करत होता. पण, दरवेळी त्याला अपयश येत होतं. त्यामुळे त्याने अशा प्रकारे कॉपी करण्याचा निर्णय घेतल्याचं त्याने भरारी पथकाकडे कबूल केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *