धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली येथील एका दांपत्याने आपल्या मुलांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली होती. दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा बोरामणी ता.जि. सोलापूर येथे थाटामाटात झाला होता.
राष्ट्रपतीचा जन्म दाखला मिळाला, शिवाय आधार कार्ड सुध्दा मिळाले. मात्र पंतप्रधानचा जन्म दाखला लालफितीत अडकला होता. अखेर तीन महिन्यांनी हा तिढा सुटला असून पंतप्रधानलाही जन्मदाखला मिळाला आहे.
चिंचोली (भु) येथील दत्तात्रय व कविता चौधरी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची नावे जगावेगळीच ठेवली. या नावामुळे चौधरी दांपत्य चर्चेत आहे होते. राष्ट्रपतीचा जन्म 19 जून 2020 रोजी झाला होता. राष्ट्रपतीचा जन्म दाखला प्रशासनाने दिला, शिवाय आधारकार्ड सुध्दा दिले.
मात्र 10 नोव्हेंबर 2021 रोजी जन्मलेल्या पंतप्रधानचा जन्म दाखला मिळत नव्हता. दत्तात्रय चौधरी यांनी बोरामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जन्म दाखल्याची मागणी केली होती. परंतु पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्यामुळे जन्म दाखला दिला नाही पंतप्रधान हे नाव बालकास दयावे की नको? असा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून सदरील अर्ज सोलापुर येथील जिल्हा निबंधक जन्म- मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या बाबत कुठलेच मार्गदर्शन मिळाले नसल्यामुळे जन्म दाखला लालफितीत अडकला होता.
दत्तात्रय चौधरी यांच्या प्राथमिक केंद्रावर गेल्या तीन महिन्यांपासून चकरा सुरू होत्या. अखेर पंतप्रधान दत्तात्रय चौधरी असा जन्मदाखला त्यांच्या मुलाला 15 फेब्रुवारी रोजी मिळाला आहे.
..म्हणून ठेवली जगावेगळी नावं
दरम्यान, जन्मदाखल्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते देखील जगावेगळी नावे ऐकूण चक्रावले होते. त्यावेळी तुम्ही आमच्यासारख्या लोकांना कमी का समजता? आपल्यासारख्या सामान्य माणसांना महत्त्वाकांक्षा असू शकते हे का समजत नाही? शेतकरी कुटुंबातून असा पंतप्रधान का असू शकत नाही ज्याला आपली जमीन विकून जगण्यासाठी संघर्ष करावा लागला? असा सवाल दत्तात्रय यांनी अधिकाऱ्यांना केला होता.