ताज्याघडामोडी

नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश!

राष्ट्रवादी काँग्रेचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं.

काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली. शिवाय, या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला गेला. तर, अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत.

राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.

या वेळी माध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “जो एक सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, जो मी २०१७ मध्ये केला होता.‘व्हाय आय किल्ड गांधी’ त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला हे वाटतं, की अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरंतर आम्हाला पसंत पडलेलं नाही आणि त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो.

२०१७ मध्ये अजानतेपणे जी गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *