ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर फडणवीसांनी केलेल्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रापुरते जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचे उत्तर सडेतोडपणे देईल. आमचे वरिष्ठ देशाच्या राजकारणात बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल.

मला राजकीय जीवनात ३० वर्षे झाली. बारामतीकरांनी मला जरी खासदार म्हणून निवडून दिले होते, पण ६ महिन्यात मी परत आलो. दिल्लीला शरद पवार यांना जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. महाराष्ट्रात मी समाधानी आहे. माझे काम चाललेले असल्याचे म्हणत अजित पवारांनी या घडामोडींवर सुरुवातीला बोलणे टाळले.

पण नंतर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक फडणवीसांच्या टीकेला उत्तर देतील.

शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचे देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोलले पाहिजे, तारतम्य पाळले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *