दापोली तालुक्यातील वणौशी गावात एकाच घरात तीन वयोवृद्ध महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दागिन्यांसाठी या महिलांना जाळून मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांना तात्काळ पकडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दापोलीतील वणौशी तर्फे नातू खोतवाही गावातील बहुतांशी घरे बंद अवस्थेत आहेत. या गावातील कुटुंबे कामानिमित्त बाहेरगावी असतात. या वाडीतील एका घरामध्ये रुक्मीणी उर्फ इंदुमती शांताराम पाटणे (वय – 78), पार्वती पाठणे (वय 101) आणि सत्यवती पाटणे (वय – 78) या तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.
त्यांच्या घरासमोर एक मंदिर आहे. तेथे पूजा करण्यासाठी विनायक पाटणे हे दररोज येतात. त्यांना आज सकाळी या तीनही महिला बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत. मंदिराची किल्ली मागण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
मागील दरवाज्याजवळ गेले असता तो दरवाजा उघडा असलेला त्यांना दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्या तीन महिलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर ही घटना पोलिसांना कळवण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 302, 397, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत तीनही महिलांचे मृतदेह सापडल्याने घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.