शेतकऱ्याचा क्लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. कंपनीने तक्रारदार यांना शेतकरी अपघात नुकसानभरपाई रक्कम 2 लाख रुपये वार्षिक 7 टक्के व्याजाने देण्याचा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही.देखमुख, सदस्या शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, नुकसानभरपाई म्हणून 25 हजार रुपये, तर तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार रुपये देण्यात यावे, असेही आयोगाच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत पंढरपूर तालुक्यातील तावशी गावच्या रहिवासी महिलेने नॅशनल इन्शुरन्स कं. लि. विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार यांचे पती शेतकरी होते. 18 नोव्हेंबर 2016 रोजी रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तलाठ्याकडे विम्याच्या क्लेमाचा दावा केला. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विमा क्लेम कागदपत्रांसह कंपनीकडे पाठवला होता, मात्र मयत यांच्या नावावर पॉलिसी कालावधी सुरू होण्यापूर्वी सातबारा व फेरफार उतारा नसल्याने क्लेम नामंजूर केला.
त्यानंतर तक्रारदारांनी अॅड. तानाजी थेटे यांच्यामार्फत आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. विम्याचे 2 लाख रुपये वार्षिक 18 टक्के व्याजाने मिळावे, नुकसानभरपाईपोटी 50, तक्रारीच्या खर्चापोटी 10 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी तक्रारीमध्ये केली. दरम्यान, तक्रारदारांचे पती शेतकरी नव्हते.
त्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर शेतजमीनधारक म्हणून पोलिसी सुरू होण्यापूर्वी आढळून आले नाही. मयताचे नाव त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वरासांच्या नावाचा समावेश करताना फेरफार उताऱ्यावर आले आहे, असे विमा कंपनीमार्फत सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत विमा कंपनीने चुकीच्या कारणास्तव क्लेम नाकारल्याचा निष्कर्ष नोंदवत आयोगाने 2 लाख रुपये वार्षिक 7 टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला.