ताज्याघडामोडी

कर्जबाजारी पित्याची मुलीस हृदयद्रावक चिट्ठी लिहून आत्महत्या

गीताजंली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जीवन असहाय झाले आहे.

शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतोय…लवकर मातीला ये…असे सासरी असणाऱ्या लेकीला मोबाईलवर संभाषण करून कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील चिंचोटी येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

बालासाहेब लक्ष्मण गोंडे (४२, रा. चिंचोटी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पिंपरखेड शिवारात दीड एकर शेती आहे. १४ रोजी रात्री ते शेतातील गोठ्यात झोपण्यासाठी गेले होते. सकाळी सहा वाजता त्यांनी नांदलगाव येथील विवाहित मुलीला फोन करून गीतांजंली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, शेतात पीक चांगले आले नाही आता तू सासर वरून लवकर निघ, मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, असे म्हणत आत्महत्या केली.

गीतांजलीने चुलत भाऊ कालिदास रामकिसन गोंडे यास फोन करून तातडीने शेतात जाण्यास सांगितले. मात्र, ते तेथे पोहोचण्यापूर्वीच बालासाहेब यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

कुटुंबाचा टाहो

वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे दिला. बालासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, तीन मुली व एक मुलगा आहे. दरम्यान, बालासाहेब यांच्या आत्महत्येने कुुटुंबाने एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचेही डोळ पाणावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *