ताज्याघडामोडी

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर फेकले काळे ऑईल!

शिवसेनेचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या समाज संघटनेच्या मेळाव्यात एका तरूणाने घोलप यांच्या अंगावर काळे आॕईल फेकले. संघटनेतील स्थानिक वादातून हा प्रकार घडला.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघटनेचा मेळावा आयोजिला होता. त्यावेळी घोलप यांच्यासह काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे, नगरसेविका संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे आदींची उपस्थिती होती. त्यावेळी काही तरूणांनी गोंधळ घातला.

त्यांचा आक्षेप असा होता की, संघटनेचे स्थानिक नेते अशोक लांबतुरे व त्यांच्या पत्नी सुरेखा लांबतुरे आदींच्या छळाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षापूर्वी शासकीय विश्रामगृहात पत्र लिहून आत्महत्या केली होती. याप्रकरणी लांबतुरे दाम्पत्यासह इतरांविरूध्द मृत शिंदे यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात सर्वांना अटकपूर्व जामीनही मिळाला होता.

या पार्श्वभूमीवर लांबतुरे दाम्पत्य राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. परंतु अलीकडे बबनराव घोलप यांनी लांबतुरे दाम्पत्याला संघटनेत पुन्हा सामावून घेतले. त्यास शिंदे कुटुंबीयांना विरोध होता.

या पार्श्वभूमीवर संघटनेच्या मेळाव्यात मृत भानुदास शिंदे यांची मुले धनराज व युवराज शिंदे यांनी मेळाव्यात गोंधळ घालत घोलप यांनाच लक्ष्य बनविले. त्यांच्या अंगावर काळे आॕईल टाकले गेले. घोलप हे पुन्हा सोलापुरात आल्यास त्यांचे कपडे फाडू, असा धमकीवजा इशाराही शिंदेबंधुंनी यांनी दिला. या घटनेमुळे घोलप यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे आदी सारेजण अवाक झाले. नंतर मेळावा सुरळीतपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *