मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आमदार पुत्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आमदाराच्या घरातच त्यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचं हाथी ताल कॉलनीत घर आहे. त्यांच्या घरात दुपारी गोळीबाराचा आवाज आला. घरातील सदस्यांनी धाव घेतली तर आमदारांचा मुलगा विभु यादव हा आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
आमदार संजय यादव यांचा १७ वर्षाच्या मुलगा विभू यादव याच्या डोक्याला गोळी लागली होती. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. विभू यादवची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. घटनेची माहिती मिळताच शहरातील काँग्रेस नेते हॉस्पिटलमध्ये आले. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.