गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाचखोरीची घटना उघड; तलाठ्याला रंगेहात पडकलं!

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. ३० हजार रूपयांची लाच घेताना चर्होली येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पडकलं आहे. मारूती अंकुश पवार (वय ४१, रा. चर्होली बु.ता.हवेली जि.पुणे) असं अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचं नाव आहे.

मृत्युपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीकडे मारूती पवार याने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र त्यातील ३० हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि मारूती पवार याला ३० हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अलीकडील काळात लाचखोरीची घटना वाढताना दिसत आहेत. तसंच या लाचखोरीविरोधात तक्रार करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आगामी काळात असे प्रकार कमी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *