ताज्याघडामोडी

उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपच सत्तेत येणार तर पंजाब आप काबीज करणार

 

पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणीपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला कौल मिळेल. तर पंजाबमध्ये अधांतरी विधानसभा अस्तित्वात येईल.

तेथे आम आदमी पक्ष सत्तेपासून काही सदस्यांनी दूर राहील, असा अंदाज एबीसी – सी व्होटरच्या पहिल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीला अद्याप पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना काही आश्‍चर्यकारक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. बहुतांश राज्यांत आम आदमी पक्ष कॉंग्रेसची हानी करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी कॉंग्रेस मध्यवर्ती भूमिकेत असेल असे गृहीत धरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

पंजाब

पंजाबमधील कॅ. अमरिंदरसिंग सरकारला आप मोठी लढत देऊन सर्वात मोठा पक्ष बनेल. कॉंग्रेसला 2014 च्या निवडणुकीत या राज्यात 38.5 टक्के मते मिळाली होती. ती 10 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 28.8 टक्के मते मिळण्याची शक्‍यता आहे तर आपच्या मतांत 23.7 वरून 35.1 टक्के इतकी वाढ होण्याची शक्‍यता आहे. जागांच्या भाषेत बोलायचे झाले तर आप 51 ते 57 जागांवर विजय मिळवेल. तर कॉंग्रेस 38 ते 46 जागांपर्यंत घसरण होईल. शिरोमणी अकाली दल 16 ते 24 जागांपर्यंत मर्यादित राहील तर भाजपला मात्र खाते उघडणे दुरापास्त होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये 70 जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्ष 44 ते 48 जागांवर विजय मिळवेल. तर कॉंग्रेसला 19 ते 23 जागा मिळतील. आपला दोन जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्‍यता आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यत्वे भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात लढत होते. त्यामुळे कॉंग्रेसची हानी हा भाजपचा लाभ किंवा उलट असे येथील राजकीय चित्र असते. उत्तराखंडमधील नागरिकांनी 2024च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनाच मतदान करणार असल्याचे 46.5 टक्के नागरिकांनी सांगितले. आश्‍चर्यकाररित्या 14.6 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना तर 10.4 टक्के लोकांनी राहूल गांधी यांना पसंती दिली आहे.

उत्तर प्रदेश

2014 निवडणुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सर्वात मोठा विजय मिळण्याची शक्‍यता आहे. या राज्यात भाजप 259 ते 267 जागांवर विजय संपादन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष 109 ते 117 जागांवर विजय मिळवेल. तर बहुजन समाज पक्ष 12 ते 16 जागा जिंकेल.

कॉंग्रेसला तीन ते सात जागा मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मतांत गेल्या खेपेपेक्षा किंचित म्हणजे 0.4 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे. तर समाजवादी पक्षाच्या मतात 6.6 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन तो प्रमुख पक्ष म्हणून पुढे येण्याची शक्‍यता आहे. येथील 44 टक्के नागरिकांनी आपण योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितल्याचा दावा या सर्वेक्षणात केला आहे.

गोवा

गोव्यातही भारतीय जनता पक्ष बाजी मारणार असल्याचे चित्र आहे. 40 आमदरांच्या विधानसभेत या भगव्या पक्षाला 22 ते 26 जागा मिळतील. आपला चार ते आठ तर कॉंग्रेसला तीन ते सात जागा मिळून आप कॉंग्रेसची जागा या राज्यात घेण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. आपला 22.2 टक्के जनाधार मिळण्याची तर कॉंग्रेसला 15.4 टक्के जनाधार मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

मणीपूर

भाजपा या ईशान्येकडील राज्यात 32 ते 36 जागांवर मुसंडी मारेल, असा अंदाज असून कॉंग्रेसला 18 ते 22 जागा मिळतील तर नागा पिपल्स फ्रंटला दोन ते सहा जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. कॉंग्रेसला 34.5 तर भाजपला 40.5 टक्के जनाधार मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *