मुंबईत १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता.
संदर्भातील माहिती घेणार
शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी या विषयावर त्यांचं मत दिलं आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
टास्क फोर्सने भीती व्यक्त केली
शाळा सुरुवर स्थगिती टास्क फोर्सने आणली आहे. ‘टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल’, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
‘शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलं आहे. राज्यभरातील त्या त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल’, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.