महाराष्ट्रात दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. पण राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आणि सिनेमागृह (थिएटर आणि मल्टिप्लेक्स) पुढील निर्णय जाहीर होईपर्यंत बंद राहणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. याआधीच कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास उपनगरीय रेल्वेतून अर्थात लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे लसचा दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि योग्य तिकीट अथवा पास घेऊन लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.तर आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे राज्यातील व्यापारी वर्ग तसेच सामान्यांना मोठा दिलासा मिळाला.
मोकळ्या मैदानावर किंवा लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना जास्तीत जास्त २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे. तसेच क्षमतेच्या ५० टक्के या प्रमाणात ग्राहकांना हॉटेलमध्ये वा रेस्टॉरंटमध्ये बसून जेवणाचा आनंद घेण्याची परवानगी राज्य शासनाने दिली.
ज्या खासगी कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना पूर्ण क्षमतेने कारभार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या कंपन्या २४ तास सुरू असतात त्यांना एका शिफ्टमध्ये क्षमतेच्या जास्तीत जास्त २५ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व दुकानांना रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली तरी धार्मिकस्थळे, नाट्यगृह, सिनेमागृह (थिएटर आणि मल्टिप्लेक्स) बंद राहतील. खेळांच्या मैदानावरील प्रवेशासाठी लसचे दोन्ही डोस घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. हे बंधन संबंधित मैदानाचे व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडू तसेच तिथे जाणारे इतर सर्वजण यांच्यासाठी आहे. नागरिकांनी लसचे दोन्ही डोस घेतले तरी मास्क घालावा आणि सोशल डिस्टंस पाळावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.