गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

लोखंडी पाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपी एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला असताना कार्यालय असलेल्या इमारतीच्याच छतावर तलवारी ठेवल्या होत्या.

प्रतिक ज्ञानेश्‍वर भोसले (वय 33, रा. पार्श्‍वनाथ नगर, जितोजी अपार्टमेंट, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी रात्री सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन हत्ती चौक ते तळजाई पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी धनकवडीतील सह्याद्रीनगर परिसरातील एक फायनान्स ऑफीस असलेल्या इमारतीच्या छतावर प्रतिक भोसले नावाच्या तरुणाने पांढऱ्या पोत्यामध्ये हत्यारे भरून ठेवली आहेत.

संबंधीत व्यक्ती त्याच ठिकाणी उभा असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या पथकाने सह्याद्रीनगरमधील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये सापळा रचून प्रतिक भोसले यास अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून पांढरे पोते ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली, तेव्हा पोत्यामध्ये लोखंडी पाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल 26 तलवारी पोलिसांच्या निदर्शनास आल्या.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनीयमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलिस कर्मचारी निलेश शिवतरे, अतुल मेंगे, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *