ताज्याघडामोडी

घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका; मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई – दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात घेता पुढील काळात जास्तीचे ऑक्‍सिजन व आयसीयू बेड्‌स लागतील. याशिवाय फिल्ड रुग्णालयासारख्या सुविधा उभाराव्या लागतील. याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

करोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ते दूरचित्र प्रणालीद्वारे बैठकीत बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते.

यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका. विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्‍सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवावा.

टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक आणि डॉ. शशांक जोशी म्हणाले, राज्यातील सात जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्‍यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरदिवशी 3 हजार मे.टन ऑक्‍सीजन निर्मिती!

राज्यात आज दरदिवशी 1300 मे.टन ऑक्‍सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती 3 हजार मे.टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ऑक्‍सीजन स्वावलंबन योजना हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्‍सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली आहेत.

याचा लाभ घेत ऑक्‍सीजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत राज्यातील त्यांची ऑक्‍सीजन निर्मिती तसेच साठवणूक क्षमता येत्या तीन ते चार आठवड्यात वाढवावी. जेणेकरून करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लागणारी ऑक्‍सीजनची अंदाजित गरज आपण भागवू शकू, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *