ताज्याघडामोडी

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले; सरकारला एक महिन्याची डेडलाइन

नाशिक – मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लॉंगमार्च काढावा, अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्यात. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसांत प्रश्‍न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असे जाहीर करतानाच या महिनाभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मूक मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत.त्याची अंमलबजावणी व्हायला 21 दिवस लागतील. प्रशासकीय स्तरावर त्याची अंमलबजावणी होत आहे, असे सांगतानाच समन्वयकांनी आंदोलन न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने एक महिन्यात मागण्या पूर्ण कराव्यात. नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच मराठा मूक मोर्चा एक महिन्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने येत्या गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल करणार असे सांगितले आहे. तसेच आयोग स्थापन करण्यात अडचणी असतील तर गायकवाड कमिशनच्या त्रुटी दूर करण्यासाठी होमवर्क करण्यासाठी पावले उचला, असे सरकारला सांगितले आहे. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आम्ही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी मूक आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आंदोलन झाले आहे. 36 जिल्ह्यांत जायची आमची इच्छा नाही. आम्हाला समाजाला दिशाहीन करायचे नाही. त्यांना दिशा द्यायची आहे.

सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, समाजाला वेठीस धरू नये, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा तपशीलही दिला. तसेच सरकारने मागण्या मान्य केल्या असून, सरकार सकारात्मक असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *