ताज्याघडामोडी

यंदाही शाळा राहणार बंदच ! दिवाळीनंतर आठवी ते बारावीचा निर्णय

सोलापूर : राज्यातील नगर, सोलापूर (Solapur), सातारा, कोल्हापूर, गोंदिया या जिल्ह्यांचा मृत्यूदर सर्वाधिक असून, अजूनही 14 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असून, त्यात सर्वाधिक धोका बालकांनाच असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑफलाइन शाळा सुरू होणार नाहीत, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, असेही सांगण्यात आले.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 11 हजार तर राज्यातील जवळपास एक लाखाहून अधिक बालकांना (0 ते 18 वयोगट) कोरोनाची बाधा झाली असून, काहींचा मृत्यूही झाला आहे. सध्या मुंबई, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सावध पवित्रा घेत संसर्ग कमी होईपर्यंत ऑनलाइन शिक्षणावरच भर राहील, असे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, सद्य:स्थितीत ऑफलाइन शाळा सुरू करणे उचित ठरणार नाही, असा अभिप्राय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन संबंधित जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ऑफलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग तर संसर्ग पूर्णपणे कमी झाल्यावर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होतील, असा अंदाज शिक्षण विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी व्यक्‍त केला. तूर्तास स्वाध्याय पद्धतीनेच त्यांचा सराव घेतला जाईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन शिक्षणाची फी द्यावीच लागेल

कोरोनामुळे यंदाही शाळा ऑफलाइन सुरू होणार नाहीत. 14 जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर पालकांना संबंधित खासगी शाळेला शैक्षणिक फी द्यावीच लागेल. परंतु, संपूर्ण वर्षाची फी भरताना पालक व शाळांनी आपापसात त्याचे टप्पे पाडावेत. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, तरीही ते फुकटात येत नाही. त्यांनाही शिक्षकांचे मानधन द्यावे लागते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरीही पालकांना खासगी शाळांची फी भरावीच लागेल, असे शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय जगताप यांनी “सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

वर्गनिहाय मुलांची संख्या

पहिली ते आठवी : 1,46,86,493

नववी ते बारावी : 56,48,028

एकूण विद्यार्थी : 2,03,34,521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *