‘तेरा’ साथ है तो, मुझे क्या कमी हैं’, अशी विवाहाबद्दलची भावना कुठं आणि विवाह करुनही समाधानी न राहणाऱ्या, एकामागून एक 13 विवाह करत 13 नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबांना लुटणाऱ्या एका लालची तरुणीला अखेर नंदुरबार पोलिसांनी हातकडीच्या बंधनात बांधलं आहे.
‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’ या गाजलेल्या गाण्यातील सोनू हेच या तरुणीचं नाव असून तिनं अजून किती जणांशी पाट लावला, आणि त्यांना फसवलं याचा शोध पोलिस घेत आहेत.
खान्देशात या सोनू शिंदे नावाच्या तरुणीने तब्बल 13 मुलांना लग्न करुन फसवलं.त्यानंतर त्यांना चिक्कार लुटलं. नंतर पळून गेली. विशेष म्हणजे ती एकटी नाही तर तिच्यापाठीमागे एक मोठी टोळीच असल्याचं समोर आलं आहे.
सोनू शिंदेची ही टोळी खरंतर हिंगोली आणि अकोला येथील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. यावेळी तिने नंदुरबारात एका कुटुंबाला फसवलं तेव्हा तिला या कामात औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचं उघड झालं आहे.
हा सगळा प्रकार नेमका कसा उघड झाला, ही टोळी नेमकी कशी पकडली गेली, त्याची माहिती एखाद्या हिंदी सिनेमाच्या पटकथेपेक्षाही सुरस आणि भीषण आहे.
सोनू शिंदे या तरुणीने दोन आठवड्यांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या मंदाने येथील एका तरुणाशी लग्न केलं. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर जोपासल्या जातात. त्यामुळे साहजिकच नवरदेव आनंदात होता. लग्नासाठी वधू पक्षाकडून काही लाखांची मागणी झाली होती. मुलाच्या कुटुंबियांनी वधू पक्षाला पैसेही दिले. पण लग्नानंतर सत्यानाश झाला. नवी नवरी नांदलीच नाही. ती पळून गेली.
घरात आलेली नवी नवरी अचानक पळून गेल्यानंतर संबंधित कुटुंबाला मोठा झटका बसला. आपण लुबाडलो गेलो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.
पोलिसांचा तपास सुरु असतानाच त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांना सोनू शिंदे आता शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाशी 13 वं लग्न करणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस आपला तपास करत असल्याचा सुगाला या टोळीला लागला. त्यांनी थेट लग्नाचं ठिकाणच बदललं. लग्न नंतर अमळनेर तालुकत्यातील ग्रामीण भागात ठरवण्यात आलं. पण ‘कानून के हाथ लंबे होते हैं’, अशा म्हणीप्रमाणे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळालीच.
पोलिसांनी अगदीच वेळेवर म्हणजे लग्न लागणार होतंच त्याआधीच लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला जेरबंद केलं. पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण वधू सोनू पकडली गेली आहे.
पोलिसांच्या या कारवाईला थोडा जरी वेळ झाला असता तर आणखी एक कुटुंब सोनू शिंदे टोळीच्या जाळ्यात अडकलं असतं. या टोळीने खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांकडून लग्न लावून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भविष्यातील अनेकांची फसवणूक टळली आहे.
महिलांविषयक कायद्यांची भीती घालून आणि कलम 498 ची दहशत दाखवून ही सोनू ज्या मुलाशी लग्न करेल, त्याच्या कुटुंबाला धमकावत पैसे उकळत असायची, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या ज्या मुलांना सोनूने फसवले, त्या सर्वांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून या सर्व प्रकरणांचा एकत्रित तपास करण्याचे आव्हान जळगाव पोलिसांसमोर आहे.
‘शादी वो लड्डु है, जो खाये पछताये; न खाये और पछतायें’ असे म्हटले जाते. इथे तर सोनू शिंदेने 13 कुटुंबांना पछताव्याचा अनुभव दिल्याने या प्रवृत्तीविरोधात जनजागृतीचे आव्हान निर्माण झाले आहे.