गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कुख्यात गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या

औरंगाबाद, 22 मे: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील बजाजनगर परिसरात कुख्यात गुन्हेगार आणि खूनातील आरोपी विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे या स्वंयघोषित डॉनची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी महाराणा प्रताप चौकात मृत विशालला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत विशालनं एक वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं एका युवकाचा खून केला होता. त्यामुळे बदलेच्या भावनेतून स्वयंघोषित डॉन विशाल फाटेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.गेल्यावर्षी वडगावतील योगेश प्रधान खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. वर्षभर कारागृहात राहिल्या नंतर 15 दिवसांपूर्वीच तो घरी आला होता.

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही तरुण एका तरुणाला बेदम मारत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेले दोन दगड देखील होते. पोलिसांनी जखमी विशाल फाटेला घाटी येथील रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीचं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. विशाल फाटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

वाळूजचा स्वयंघोषित डॉन

27 वर्षीय मृत विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे हा वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून तो स्वतःला वाळूजचा स्वयंघोषित डॉन समजत असायचा. नेहमी नशेत राहणारा विशाल स्वतःजवळ सतत चाकू बाळगायचा. त्यानं दोन दिवसांपूर्वी वाळूज येथील एका मासे विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत फुकटात मासे नेले होते. याप्रकरणी मासे विक्रेत्यानं गुन्हा दाखल केला नाही. त्याचबरोबर 2012 साली दुचाकी जळीतकांडातही मुख्य सूत्रधार म्हणून विशालला अटक करण्यात आलं होतं. त्याच्याविरोधात मारहाण, लूटमार, खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो ज्या परिसरात वास्तव्याला होता, तेथील नागरिकही त्याच्या त्रासाला कंटाळले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *