गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण

इंदापूर, 09 मे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये घुसून काही तरुणांनी तुफान राडा केला आहे. आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत, असा आरोप करत दोन तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

संबंधित दोन आरोपींची नावं सुनील चंद्रकांत रणखांबे आणि रवी चंद्रकांत रणखांबे असून दोघंही इंदापूरमधील पंचायत समिती कॉलनीतील रहिवासी आहेत. या दोघांनी शनिवारी (8 मे) रोजी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये घुसून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. यावेळी आरोपी युवकांनी कोणालाही न विचारता जबरदस्तीने कोविड सेंटरमध्ये प्रवेश केला आणि  ‘आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत’ असा आरोप करत डॉ. श्वेता कोडग यांचा हात पिरगळला आणि डाव्या गालावर चापट मारली.

यावेळी फिर्यादी  डॉ. श्वेता कोडग कोविड रुग्णावर उपचार करत होत्या. यासोबतच रुग्णालयातील परिचारिका अंजली पवार आणि सोम्मया बागवान या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्याच थांबले नाहीत, तर त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर पीडित डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत अंजली पवार यांच्या गळ्याजवळ दुखापतही झाली आहे. याप्रकरणी डॉ. श्वेता कोडग यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

आरोपी सुनील चंद्रकांत रणखांबे आणि रवी चंद्रकांत रणखांबे यांचे वडील चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण मागील काही दिवसांपासून उपचार सुरू असताना देखील त्यांचे वडील बरे का होत नाहीत. हाच राग मनात धरून त्यांनी डॉक्टर आणि नर्संना दोष देत त्यांना मारहाण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *