राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय.
राज्यात काल 2 लाख 36 हजार 815 कोरोना चाचण्या झाल्या त्यात 56 हजार 286 नवीन कोरोनाबाधित आढळले चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण 23 पुर्णांक 76 शतांश टक्के आहे. आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 32 लाख 29 हजार 547 झाली आहे. दैनंदिन बाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हं दिसत नसली तरी दररोज बरे होणार्या रुग्णांची संख्या मात्र वाढते आहे. काल 36 हजार 130 रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण 26 लाख 49 हजार 757 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 82 पुर्णांक 7 शतांश टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 21 हजार 317 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल कोविड 19 च्या 376 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत या रोगामुळे 57 हजार 28 रुग्ण दगावले आहेत.
|