ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी 16 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केला आहे.आदेशात नमूद केले आहे की, दहा आणि अकरा एप्रिलला कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे. तथापि या आदेशानुसार निवडणूक प्रचार आणि अनुषांगिक कामकाजास्तव दहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते अकरा एप्रिलच्या रात्री आठ वाजेपर्यंत सदरची संचारबंदी पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रासाठी शिथील करण्यात येत आहे. मात्र जमावबंदीचे मनाई आदेश लागू राहतील.

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, रॅली यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी द्यावी. मात्र त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी असल्यास उपलब्ध जागेच्या पन्नास टक्के परंतु 200 पेक्षा जास्त व्यक्ती नसतील या मर्यादेत परवानगी द्यावी. असे कार्यक्रम खुल्या जागेत असल्यास जागेच्या पन्नास टक्के क्षमतेपर्यंत परवानगी द्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी कोविड विषयक नियमांचे पालन होते किंवा कसे याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांकडून नियमांचा दोनपेक्षा जास्त वेळेस भंग केल्यास अशा उमेदवारांना पुढील राजकीय मेळाव्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व राजकीय कार्यक्रमात कोविड विषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *