महाराष्ट्र शासनाचे दि.5/4/2021 रोजीचे आदेशानुसार 30 एप्रिल अखेर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर झाल्याने पंढरपूर येथील गोरगरीब कष्टकरी व व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने आ.प्रशांत परिचारक यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीससाहेब यांचेशी संपर्क साधला व मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांना पत्राव्दारे लॉकडाऊन रद्द करा अन्यथा त्यांना उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान द्या अशा प्रकारची पत्राव्दारे मागणी केली.
आ.प्रशांत परिचारक म्हणाले, लॉकडाऊन हा कोरोना प्रादुर्भाव रोखणेचा पर्याय नाही, अनेक गोष्टी पैंकी तो एक भाग आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट हे मुख्य कोरोना प्रादुर्भाव रोखणेचे काम प्रशासनामार्फत केले जात आहे. त्यामध्ये सर्व जनता मास्क, सॅनिटायझर आदींसह सहकार्य करीत असताना लॉकडाऊन करणे चुकीचे आहे.
त्यातच तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार वाऱ्यावर जगणारे गाव आहे, वर्षभरातील वारी रद्द झालेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. पुन्हा एकदा शासनाने विठुरायाचे मंदिर बंद केलेमुळे सुरळीत होणारी आर्थिक व्यवस्था पुन्हा विस्कळीत होणेची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत याचा फटका मंदिरावर अंवलबून असणाऱ्या लहानमोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी, हारफुले विक्रेते, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगावाले, दैनंदिन कामकरून रोजगार करणारे गोरगरीब मजूर अशा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. याबाबत पंढरपूरातील व्यापारी संघटना, सर्वसामान्य व्यावसायिक यांचेमध्ये महाविकासआघाडी सरकार विरूध्द प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीनारायण भट्टड यांचेकडे आ.प्रशांत परिचारक, भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.समाधान आवताडे, आ.रणजीतसिंह मोहितेपाटील, रोंगे सर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांचेसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेसमवेत आ.परिचारक यांनी फोनव्दारे चर्चा घडवून आणली, त्यांचे सूचनेनुसार तत्काळ मा.मुख्यमंत्री महोदयांना लॉकडाऊन रद्द करणेबाबत पत्रही पाठविण्यात आले.
आ.परिचारक पत्राव्दारे मागणी करताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन सुरू ठेवणार असल्यास पंढरपूरातील अशा कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी लॉकडाऊन काळात उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान देणेत यावे, याबाबत शासनस्तरावर त्वरीत निर्णय व्हावा अन्यथा लॉकडाऊन रद्द करून मंदिर पुर्ववत सुरू ठेवणेत यावे. आ.प्रशांत परिचारक यांचे भूमिकेमुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.