ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला येथील अनुसुचित जमातीच्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्या कुटुंबासह घेणार चंद्रभागेत जलसमाधी!

पंढरपूर (प्रतिनिधी):- शेगाव दुमाला (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या अनुसुचित जमातीच्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मनोज कोरे या आपल्या कुटुंबासह चंद्रभागा नदीमध्ये जलसमाधी घेणार असल्याची माहिती त्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे  दिली आहे.

शेगाव दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठीचे आरक्षण अनुसुचित जमाती महिला जागेसाठी राखीव झालेले आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या दावेदार सौ.कविता मनोज कोरे या एकमेव सदस्य आहेत. परंतु एका ग्रामपंचायत सदस्याने जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन सौ. कोरे यांचा महादेव कोळी जातीचा दाखला बोगस असल्याचा आरोप केला आहे. परंतु सौ. कोरे यांनी हा आरोप फेटाळत आपल्यावर जाणुन बुजून राजकीय सुडबुध्दीने कटकारस्थान रचून सरपंचपदापासुन आपल्याला दुर करण्याचा विरोधकांचा कुटील डाव असल्याचे म्हटले आहे.
माझ्या जातीवरच प्रश्‍नचिन्हं उभे करुन माझ्यासह माझ्या कुटुंबाची खुप मोठी मानहानी ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रणवी अमोल इंगळे यांनी केली आहे. त्यांच्यावर व त्यांना माझ्याविरुध्द कटकारस्थान करणेस भाग पाडलेल्या पाठीमागील सुत्रधारांना कडक शासन व्हावे. अन्यथा आम्ही सर्व कुटुंब चंद्रभागेत जलसमाधी घेऊ, आमच्या कुटुंबाच्या मृत्युस व होणार्‍या परिणामास सर्वस्वी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणार्‍या ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रणवी अमोल इंगळे व त्यांना यासाठी सहकार्य करणारे विरोधक राहतील. असा इशारा सौ. कविता मनोज कोरे यांनी दिला आहे.

निवडणुकीच्या आधी अर्ज छाननी करताना माझ्या जातीच्या दाखल्यावर कुणीही कोणतीच हरकत घेतली नाही, परंतु आज जेंव्हा सरपंचपदासाठी माझी वर्णी लागु शकते, हे उघड झाले तेंव्हा जाणुनबुजुन मी आदिवासी महादेव कोळी समाजाची आहे आणि मला ही संधी मिळु नये,  म्हणून विरोधकांनी आत्ता अशाप्रकारे जातीच्या दाखल्यासंदर्भात हरकत घेऊन माझ्यावर अन्याय केला आहे. असेही सौ.कविता कोरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *