गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

NAVY अधिकाऱ्याचं अपहरण करून जिवंत जाळले

पालघर, 6 फेब्रुवारी : नेव्ही अधिकाऱ्याचं अपहरण करून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. चेन्नई विमानतळावरून या अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं आणि तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन त्याला जिवंत जाळण्यात आलं. सुरजकुमार मिथिलेश दुबे(वय-27, रा. झारखंड, रांची) असं खून झालेल्या नेव्ही अधिकाऱ्याचं नाव आहे. 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.

सुरजकुमार मिथिलेश दुबे यांना पेट्रोल टाकून जाळल्यानंतर याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र तिथं शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

इंडियन नेव्हीत 2001 साली सिबिंग सीमॅनपदी रुजू झालेला मिथिलेश दुबे हे 31 जानेवारी रोजी चेन्नई विमानतळावर पोहोचले. तेथे तीन अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना तीन दिवस चेन्नईला अज्ञात स्थळी कोंडून ठेऊन त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याला त्यांनी नकार दिल्यानंतर कारमधून 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणण्यात आले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. दरम्यान, दुपारच्या सुमारास जंगलात विवस्त्र होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यानंतर, स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत वेवजी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दुबे यांना डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  चौकशीवेळी त्यांनी पोलिसांना जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलविण्यात आले, तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरण कर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात कलम 307, 364, 392 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास या ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंभार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *