ताज्याघडामोडी

पंढरीत क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचे सोशल मीडियावर संतप्त पडसाद 

पंढरीत क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेचे सोशल मीडियावर संतप्त पडसाद 

कोळी महादेव समाजातील दोन संस्थांचा वाद पुन्हा उफाळला

नगर पालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची गरज

क्रांतिकारक व कोळी महादेव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या स्व. राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या व या ठिकाणी असलेल्या पाणपोईचे रांजण फोडल्याच्या  पोस्ट आज सोशल मीडियावर फिरू लागल्या आणि या घटनेच्या निषेदार्थ सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहेत.या बाबत दोन्ही गटाकडून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात हा वाद पोहोचला असून हा वाद  न मिटल्यास दोन्ही परस्पर विरोधी गटात तणाव वाढत जाणार असल्याने समाजातील जेष्ठ नेत्यांनी व पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले आहे. 

      या वादाची सविस्तर पार्शवभूमी अशी कि,एकेकाळी पंढरपुर नगर पालिकेच्या लोकमान्य विद्यालयाचे विविध कार्यक्रमासाठीचे संकुल म्हणून ओळखल्या जात असलेल्या खुले नाट्य गृहाची संपूर्ण जागा हि महर्षी वाल्मिकी महासंघाचे संस्थापक गणेश अंकुशराव यांच्या मागणीनुसार समाजाच्या विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पंढरपूर नगर पालिकेत आ.भारत भालके प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता असताना नगर पालिकेने ठराव करून दिली होती.या ठिकाणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यासह,गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव यासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर आदी विविध उपक्रम राबविले जातात.तर नगर पालिकेच्या याच जागेच्या एका भागात असलेल्या व सरकारी तालीम म्हणून ओळखल्या जात असलेल्या तालमीची जागा पंढरीतील कोळी समाजातीलच राजू शिंदे नामक व्यक्तीच्या अधिपत्याखालील सदभावना संस्थेला देण्याचा ठराव परिचारक प्रणित नगर पालिकेतील सत्ताधारी आघाडीने दोन वर्षांपूर्वी केला होता. या ठरावा बाबत हरकती व सूचना मागिवण्यात आल्याची जाहिरातही नगर पालिकेने प्रकाशित केली होती असे सांगण्यात येते मात्र ती कुठल्या वृत्तपत्रात प्रकाशीत केली होती याची माहिती देण्यात सदभावना संस्थेचे राजू शिंदे यांनी असमर्थता दर्शविली होती.मात्र हि बाब काही दिवसापूर्वी उघड झाल्याने या दोन गटातील तणाव शिगेला पोहोचला होता.या तणावातूनच गत महिन्यात हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते पण समाजातील काही जेष्ठ मंडळींनी हस्तक्षेप केल्याने व एका राजकीय नेत्याने हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे हा इशारा वजा सल्ला दिल्याने शांत झाले होते.    

         आज पुन्हा हा वाद उफाळून आला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.पंढरपुर नगर पालिकेने खुले नाट्य गृहासह हि संपूर्ण जागा आम्हाला दिली आहे असा दावा गणेश अंकुशराव यांच्याकडून केला जात असून त्याच वेळी या परिसरातील अनेक नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असलेल्या सरकारी तालीमीचा या सदभावना संस्थेला ताबा देण्याचा ठराव चुकीचा आहे असाही दावा करण्यात येत होता.व यातून सतत धुसफूस सुरु होती.  

    रविवार दिनांक २३ रोजी राघोजी भांगरे तालीम येथील पाणपोईच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डची विटम्बना केल्याचे आढळून आल्याने दोन्ही गटात पुन्हा तणाव वाढला असून याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत.  

     या वादातून काही अनर्थकारी प्रसंग ओढवू नये यासाठी नगर पालिका प्रशासनानेही पुढे येणे गरजेचे असून पंढरपूर नगर पालिकेच्या मालकीच्या खुले नाट्य गृहाच्या जागेपैकी किती जागा महर्षी वाल्मिकी संघास देण्यात आली व सरकारी तालीम म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या राघोजी भांगरे तालीमीची जागा कुणाला आणि कुठल्या अटी व शर्थीसह देण्यात आली याचा खुलासा करणे गरजेचे झाले आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *